नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांसह सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अमित शाह यांना मिळालेल्या यशाबद्दल गंभीरने त्यांचे अभिनंदन केले. गंभीरने त्याच्या आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो 'एक्स' अकाऊंटवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "आदरणीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत सुरक्षिततेच्या बाबतीत अधिक चांगला होईल आणि देशात स्थिरता वाढेल".
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने भाजपचा उमेदवार म्हणून पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली होती. गंभीरने त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांचा ६,९५,१०९ मतांनी पराभव केला होता. आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गंभीरने २ मार्च २०२४ रोजी जाहीर केले होते, की तो राजकारण सोडत आहे आणि भविष्यात फक्त क्रिकेट प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करेल.
गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ ३० जून रोजी T20 वर्ल्ड कपनंतर लगेचच संपत आहे. अलीकडील काही रिपोर्ट्सनुसार, द्रविडनंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. मात्र, त्यानी बीसीसीआयसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या, त्या बोर्डाने मान्य केल्या आहेत.
अमित शहा यांनी एनडीए सरकारच्या पहिल्या कार्यकाळापर्यंत (२०१४-२०१९) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. पण जेव्हा त्यांचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आले, म्हणजे २०१९ मध्ये, त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आणि त्यांना देशाचे गृहमंत्रीपद देण्यात आले.
आता मोदी ३.० मध्ये त्यांना दुसऱ्यांदा गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शाह यांनी २०२४ मध्ये गांधीनगर निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना एकूण १०,१०,९७२ मते मिळाली आणि त्यांनी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा ७,४४,७१६ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
संबंधित बातम्या