भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला 'अँग्री यंग मॅन' म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे, गंभीरने काही दिवसांपूर्वीच स्वतःलाच अँग्री मॅन हे नाव दिले होते. गौतम गंभीरला अनेकवेळा मैदानावर रागाच्या भरात संयम गमावताना अनेकांनी पाहिले आहे.
आयपीएलमध्येही लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून गंभीरचा विराट कोहलीशी वाद झाला होता. पण आता या दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने गौतम गंभीरचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा याआधी कधीच न ऐकलेला आहे.
माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा याने राज शामानी याच्या यूट्यूब पॉडकास्टवर गौतम गंभीरशी संबंधित एक न ऐकलेला किस्सा शेअर केला आहे.
वास्तविक, गौतम गंभीर आज टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे आणि त्याचा सहकारी आकाश चोप्रा हा हिंदी कॉमेंट्रीचा सर्वात प्रसिद्ध समालोचक आहे. दोघांनीही जवळपास एकाच वेळी क्रिकेटला सुरुवात केली होती.
आकाश चोप्राने अलीकडेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्याशी संबंधित एक भयानक गोष्ट सांगितली.
गंभीरने चक्क एका ट्रक ड्रायव्हरशी भांडण केले होते, असा खुलासा आकाश चोप्राने केला.
“तो नेहमीच असाच राहिला आहे. त्याच्या खेळासाठी खूप मेहनती. थोडा गंभीर पण खूप धावा करतो. तो नेहमी मनापासून बोलतो. मानसिकदृष्ट्या, तो खूप लवकर रागात येतो. पण प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व असते. गंभीरचे एकदा दिल्लीत एका ट्रक ड्रायव्हरसोबत भांडण झाले होते.
यावेळी तो त्याच्या कारमधून उतरला आणि चक्क ट्रकवर चढून त्याची कॉलर पकडली. कारण ड्रायव्हरने चुकीचा टर्न घेतला होता आणि तो गंभीरलाच शिवीगाळ करत जात होता. अशा स्थितीत त्याने हा प्रकार केला. मी म्हणत होतो, 'गौती, तू हे काय करतोस?' तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि तू असा आहेस.
गंभीर आणि आकाश दिल्लीसाठीही एकत्र खेळले आहे. त्यानंतर दोघे टीम इंडियात आले.
आकाश चोप्राही ओपनिंगला खेळायचा. त्यावेळी टीम इंडियात एकच जागा शिल्लक होती. अशा स्थितीत आकाश चोप्रा ओपनिंगला काही खास करू शकला नाही. त्यानंतर गौतम गंभीरने चांगला खेळ दाखवत ती जागा स्वताच्या नावावर करून घेतली. यानंतर गंभीरची कारकीर्द वेगाने पुढे गेली आणि त्याने राष्ट्रीय संघात मोठी उंची गाठली.
तर आकाश चोप्रा जास्त काळ संघात कायमस्वरूपी स्थान मिळवू शकला नाही. त्याने केवळ १० कसोटी सामने खेळले.