Gautam Gambhir : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून वगळण्यात आलं आहे. यामागे फिटनेसचं कारण असलं तरी त्यामुळं टीम इंडियासह बुमराहच्या चाहत्यांनाही ४४० व्होल्टचा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं या मुद्द्यावर अखेर मौन सोडलं आहे.
बुमराह सध्या पाठीच्या खालच्या भागाला झालेल्या दुखापतीशी झुंज देत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीदरम्यान बुमराहला दुखापत झाली होती. तो १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट होईल असं वाटत होतं, मात्र बीसीसीआयनं तो खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याबाबत मौन सोडलं आहे. बुमराहची नेहमीच उणीव जाणवेल. हर्षित आणि अर्शदीप सारख्या खेळाडूंकडून प्रशिक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत, असं तो म्हणाला.
अहमदाबादमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर गंभीर बोलत होता. 'बुमराह आऊट झाला आहे हे जगजाहीर आहे. मी तुम्हाला सर्व डिटेल देऊ शकत नाही कारण तो किती काळ बाहेर राहणार आहे हे मेडिकल रिपोर्टवर अवलंबून आहे. एनसीए (नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी) मध्ये वैद्यकीय टीम हा निर्णय घेते. आम्हाला तो संघात हवा होता. तो काय करू शकतो हे आम्हाला ठाऊक आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मात्र, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, असं गंभीर म्हणाला.
'हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग सारख्या युवा खेळाडूंसाठी ही संधी आहे. कधीकधी आपण शोधत असलेल्या या संधी असतात. हर्षितनं संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं काही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. होय, बुमराहची नेहमीच आठवण येईल. पण मोहम्मद शमीसारखा अनुभवी खेळाडू परत येणं नेहमीच चांगलं असतं, असंही गंभीर म्हणाला.
हर्षितनं भारत-इंग्लंड वनडे मालिकेत तीन सामन्यांत एकूण ६ बळी घेतले होते. अर्शदीपला सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानं अहमदाबादमध्ये दोन बळी घेतले. अनुभवी वेगवान गोलंदाज शमीनं दोन सामन्यांत दोन बळी घेतले. तो शेवटच्या एकदिवसीय सामन्यात खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. हर्षित सोबतच 'मिस्ट्री स्पिनर' वरुण चक्रवर्तीचा संघात प्रवेश झाला आहे. त्याला फलंदाज यशस्वी जयस्वालच्या जागी संधी देण्यात आली आहे. यशस्वीला इंग्लंड मालिकेत एक सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यात तो केवळ १५ धावा करू शकला. हा त्याचा वनडे पदार्पणाचा सामना होता. हायब्रीड मॉडेल करारानुसार भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हर्षित राणा आणि मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा.
संबंधित बातम्या