जाहिरातीत सचिनचा डीपफेक व्हिडिओ वापरणे महागात पडले!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  जाहिरातीत सचिनचा डीपफेक व्हिडिओ वापरणे महागात पडले!

जाहिरातीत सचिनचा डीपफेक व्हिडिओ वापरणे महागात पडले!

Jan 18, 2024 08:59 AM IST

Sachin Tendulkar Fake Video: एका गेमिंग अ‍ॅपच्या मालकाने आपल्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ वापरल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका गेमिंग अ‍ॅपच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणतो की, त्याची मुलगी सारा अनेकदा स्कायवार्ड एव्हिएटर क्वेस्ट गेमिंग अ‍ॅपवर गेम खेळते. या गेमच्या माध्यमातून ती दररोज लाखो रुपये कमवत असल्याचा दावा करण्यात आला.

सचिनचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी मंगळवारी पश्चिम भागातील सायबर पोलिसांकडे या व्हिडिओची तक्रार केली. हुरमा नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला तेव्हा हा व्हिडिओ आपल्या लक्षात आल्याचे त्यांनी नमूद केले. सचिनने पत्रकार विक्रम साठ्ये यांना दिलेल्या जुन्या मुलाखतीतील ही दृश्ये आहेत. हा ऑडिओ अस्सल वाटावा म्हणून डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हिडिओवर लावण्यात आल्याचे दिसत आहे.' या जाहिरातीत साराने पवर गेम खेळून दररोज १.८ लाख रुपये जिंकल्याचा दावा केला आहे.

पारधे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गेमिंग अ‍ॅपचा मालक आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोशल मीडिया युजरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सचिनने एक्सवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "हे व्हिडिओ फेक आहेत. तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर होताना दिसणे चिंताजनक आहे. प्रत्येकाने अशा प्रकारचे व्हिडिओ, जाहिराती आणि अ‍ॅप्स मोठ्या संख्येने कळवावेत ही विनंती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने तक्रारींबाबत सतर्क आणि उत्तरदायी असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती आणि खोटारडेपणाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून त्वरित कारवाई करणे महत्वाचे आहे.

पश्चिम भागातील सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते फेक व्हिडिओ शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याचा आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक करत आहेत.

 

संशयास्पद उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सचिनचे फोटो आणि व्हिडिओ वापरण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सायबर पोलिसांनी मास्टर ब्लास्टरच्या छायाचित्रांचा वापर करून त्याच्या परवानगीशिवाय फॅट बर्निंग स्प्रेची जाहिरात केल्याप्रकरणी एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. कंपनीने आपली उत्पादने विकण्यासाठी सचिनच्या नावाने त्यांचे फोटो असलेली वेबसाइटही सुरू केली होती.

Whats_app_banner