Former Cricketer Anshuman Gaikwad passed away : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे गुरुवारी पहतेच्या सुमारास निधन झाले. त्यांनी ब्लड कॅन्सरशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. त्यांच्यावरील उपचारांचा खर्च पाहता बीसीसीआयने १ कोटी रुपयांची मदत त्यांना केली होती.
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी ब्लड कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर आज पहाटे निधन झाले. त्यांच्या १२ वर्षांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत, गायकवाड यांनी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी २ शतकांसह २ हजार २५४ धावा केल्या आणि १९८३ मध्ये जालंधरमध्ये पाकिस्तानविरुद्ध २०१ धावा केल्या. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गायकवाड यांना मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या कठीण काळात शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधला आणि त्यांना पाठिंबा दिला.
गायकवाड यांच्या गंभीर प्रकृतीबद्दल या वर्षाच्या सुरुवातीला माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी पहिल्यांदा माहिती दिली होती. पाटील यांनी खुलासा केला की गायकवाड हे एक वर्षापासून ब्लड कॅन्सरशी लढा देत असून त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत.
गायकवाड यांनी स्वत: पाटील यांना त्यांच्या आर्थिक अडचणी बद्दल माहिती दिली होती. यानंतर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची विनंती केली होती. शेलार यांनी देखील या बाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.
१९८३ च्या विश्वचषकाचे हीरो आणि कर्णधार कपिल देव यांनीही गायकवाड यांच्यासाठी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते. त्यांनी स्वत: गायकवाड यांना मदत दिली होती. त्यांच्या सोबत मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदन लाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद यांसारख्या माजी क्रिकेट दिग्गजांसह त्यांच्या सहकाऱ्याला मदत करण्यासाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी मोठे काम केले.
अंशुमन गायकवाड यांनी १९९७ , १९९९ आणि २००० दरम्यान दोनदा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्याच्या प्रशिक्षणात भारताने २००० चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपदही पटकावले. ते प्रशिक्षक असताना, अनिल कुंबळेने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कसोटी डावात १० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनण्याचा विक्रम केला. गायकवाड यांनी १९९० च्या दशकात राष्ट्रीय निवडकर्ता आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
संबंधित बातम्या