विराट कोहलीच्या बेंगळुरूमधील वन 8 कम्युन रेस्टॉरंटविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट उघडून मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याच्या आरोपावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. one8 कम्युन रेस्टॉरंट बंगळुरूच्या एमजी रोड येथे आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दीड वाजेपर्यंत रेस्टॉरंट सुरू होते. तर बेंगळुरू शहरात रेस्टॉरंट्स आणि पब्स फक्त पहाटे १ वाजेपर्यंतच उघडण्याची परवानगी आहे. हा एफआयआर ६ जुलै रोजी नोंदवण्यात आला होता आणि तो वन8 कम्युन रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की केवळ विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवरच नाही तर इतर ३-४ रेस्टॉरंटवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री उशिरा या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारीही पोलिसांना मिळाल्या होत्या.
विराट कोहलीच्या वन8 कम्युनच्या दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता येथेही शाखा आहेत. बेंगळुरू शाखा डिसेंबर २०२३ मध्ये उघडण्यात आली, ती चिन्नास्वामी स्टेडियमजवळ असलेल्या रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे. या रेस्टॉरंटच्या उद्घाटनानंतर विराटने एका मुलाखतीत सांगितले होते की, बेंगळुरू हे त्याचे आवडते शहर आहे, म्हणून त्याने शाखेसाठी बेंगळुरूची निवड केली.
याआधी २०२१ मध्ये विराट कोहलीचे वन8 कम्युन रेस्टॉरंट वादात सापडले होते. त्यावेळी LGBTQ+ समुदायातील लोकांना तेथे प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
संबंधित बातम्या