मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Watch : नवख्या फिन अ‍ॅलनने शाहीन आफ्रिदीला चोपलं, एकाच षटकात फटकावल्या 'इतक्या' धावा

Watch : नवख्या फिन अ‍ॅलनने शाहीन आफ्रिदीला चोपलं, एकाच षटकात फटकावल्या 'इतक्या' धावा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 04:52 PM IST

Finn Allen Hit 24 Runs In Shaheen Afridi Over : शाहीन शाह आफ्रिदीचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यात शाहीनने ३ विकेट घेतल्या. पण या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली. त्याने ४ षटकात ४६ धावा दिल्या.

Finn Allen vs Shaheen Afridi
Finn Allen vs Shaheen Afridi (Hindustan Times)

Finn Allen vs Shaheen Afridi : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ५ टी-20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (१२ जानेवारी) ऑकलंड येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद २२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान १८० धावांवर सर्वबाद झाला.

दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदीचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यात शाहीनने ३ विकेट घेतल्या. पण या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली. त्याने ४ षटकात ४६ धावा दिल्या.

 

शाहीनच्या एकाच षटकात २४ धावा

न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलनने शाहीनच्या एका षटकात २४ धावा फटकावल्या. डावाच्या तिसऱ्या आणि शाहीनच्या दुसऱ्या षटकात फिन अ‍ॅलनने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले.

अ‍ॅलनने शाहीनच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. यॉर्कर मारण्याच्या प्रयत्नात शाहीनचा चेंडू हाफ व्हॉली ठऱला, हा चेंडू अ‍ॅलनने प्रेक्षकांमध्ये पाठवला. यानंतर अ‍ॅलनने सलग ३ चेंडूंत ३ चौकार मारले.

दुसरा चेंडू मिडऑफच्या दिशेने, तिसरा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आणि चौथा कव्हरच्या दिशेने चौकार गेला. यानंतर फिन अ‍ॅलनने ओव्हरच्या ५व्या चेंडूवर षटकार ठोकला. शाहीन आफ्रिदीचा पुन्हा एकदा यॉर्कर चुकला आणि चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला. शेवटच्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. अशा प्रकारे शाहीनने या षटकात २४ धावा खर्च केल्या.

शाहीनने पहिल्याच षटकात विकेट घेतली होती

दरम्यान, शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने पहिल्याच षटकात डेव्हॉन कॉनवेला शुन्यावर झेलबाद केले होते. पण त्यानंतर फिन अ‍ॅलन, केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेलने जबरदस्त फलंदाजी केली आणि न्यूझीलंडला २२६ धावांपर्यंत पोहोचवल.

WhatsApp channel