मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Finn Allen Century : शाहीन-हारिस रौफ हा मार कधीच विसरणार नाहीत, फिन अ‍ॅलनने पाक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या!

Finn Allen Century : शाहीन-हारिस रौफ हा मार कधीच विसरणार नाहीत, फिन अ‍ॅलनने पाक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2024 12:36 PM IST

Finn Allen Century : न्यूझीलंडकडून सलामीवीर फलंदाज फिन अ‍ॅलनने पाकिस्तानी गोलंदाजांचे कंबरडे मोडले. फिन अ‍ॅलनने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने १६ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने १३७ धावा फटकावल्या.

Finn Allen Century
Finn Allen Century (AFP)

Finn Allen Century vs Pakistan : पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. येथे पाकिस्तान शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. यंदाच्या T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. 

मात्र या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील तिसरा सामना आज (१७ जानेवारी) ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हलच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला १७९ धावाच करता आल्या.

अ‍ॅलनने ४८ चेंडूत शतक पूर्ण केले

न्यूझीलंडकडून सलामीवीर फलंदाज फिन अ‍ॅलनने पाकिस्तानी गोलंदाजांचे कंबरडे मोडले. फिन अ‍ॅलनने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने १६ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने १३७ धावा फटकावल्या. यासोबतच फिन अ‍ॅलनने न्यूझीलंडसाठी T20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या केली आहे. अ‍ॅलनने अवघ्या ४८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला होता. यानंतर त्यांनी २० षटकात ७ गडी गमावून २२४ धावा केल्या. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डेव्हन कॉनवे अवघ्या ७ धावा करून बाद झाला. मात्र यानंतर फिन अ‍ॅलनने डावाची सुत्रे हाती घेतली आणि पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ल चढवला.

अ‍ॅलनने वेगाने फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांची अवस्था बिकट केली. त्याने ६२ चेंडूंचा सामना करत १३७ धावा केल्या. अ‍ॅलनच्या या खेळीत ५ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश होता. अ‍ॅलनचा स्ट्राइक रेट २२०.९७ होता. 

अ‍ॅलनने पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या

पाकिस्तानची गोलंदाज फिन अ‍ॅलनला कधीच विसरणार नाहीत. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. हरिस रौफ सर्वात महागडा ठरला. त्याने ४ षटकात ६० धावा दिल्या. त्याने २ विकेट्स घेतल्या. 

मोहम्मद नवाजने ४ षटकात ४४ धावा देत १ विकेट घेतला. तर कर्णधार शाहीन आफ्रिदीने ४ षटकात ४३ धावा देऊन १ बळी घेतला. जमान खानने ४ षटकात ३७ धावा देत एक विकेट घेतली. मोहम्मद वसीम ज्युनियरने ४ षटकात ३५ धावा दिल्या.

फिन अ‍ॅलनने न्यूझीलंडसाठी टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या बनवली आहे. याआधी महिला क्रिकेटर सुझी बेट्सने नाबाद १२४ धावा केल्या होत्या. ब्रेंडन मॅक्युलमने १२३ धावा केल्या होत्या. त्याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi