Ind vs Aus 4th Test : नितीश कुमार रेड्डी याने पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच धमाका केला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात नितीशने शतक झळकावले. तो ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
टीम इंडिया कठीण परिस्थितीत होती आणि एका क्षणी फॉलोऑन वाचवण्यासाठीही धडपडत होती. मात्र नितीशने येथून संघाला ३५० चा टप्पा पार करून दिला. या चमकदार कामगिरीमागे त्याच्या वडिलांच्या त्यागाचा मोठा हात आहे.
नितीश रेड्डी हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणचा रहिवासी आहेत. त्याचे वडील मुत्याला रेड्डी हे हिंदुस्थान झिंक कंपनीत काम करत होते. नितीशने ५ वर्षांचा असताना प्लास्टिकच्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमला वारंवार जायचा. नितीशची क्रिकेटची आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याच्या कारकिर्दीसाठी खूप मोठा त्याग केला.
नितीश १२-१३ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांची उदयपूरला बदली झाली. बदलीनंतर नितीश याच्या क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो, असे मुत्याला रेड्डी यांना वाटत होते. यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक क्रिकेटमधील राजकारणामुळे नितीश याची कारकीर्द बिघडू शकते, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळेच त्यांनी नितीशच्या क्रिकेटकडे पूर्ण लक्ष दिले. या निर्णयामुळे त्यांना नातेवाईक आणि परिचितांच्या टीकेला आणि टोमण्यांना सामोरे जावे लागले. लोक त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे पण मुत्याला रेड्डी आपल्या ध्येयावर ठाम राहिले.
नितीश याच्या प्रतिभेची पहिली ओळख माजी भारतीय क्रिकेटपटू एमएसके प्रसाद यांना झाली. एमएसके प्रसाद यांनी १२ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील स्थानिक सामन्यांदरम्यान नितीशला पाहिले.
त्यांच्या मदतीने नितीशला आंध्र क्रिकेट असोसिएशनमध्ये स्थान मिळाले. वयाच्या १७ व्या वर्षी नितीशने आंध्र प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादने नितीशला २० लाख रुपयांना खरेदी केले. त्याला या मोसमात जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. पण IPL २०२४ मध्ये नितीशने १३ सामन्यात ३०३ धावा केल्या आणि ३ विकेट्सही घेतल्या. या शानदार कामगिरीनंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. बांगलादेशविरुद्धच्या T20 मधील त्याच्या अप्रतिम कामगिरीनंतर त्याला अष्टपैलू म्हणून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले.
संबंधित बातम्या