भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळली जात आहे. टीम इंडियाने यापूर्वी २०२१ मध्ये येथे कसोटी सामना खेळला होता. पण आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर येथे सुरू असलेली कसोटी पावसामुळे वाहून गेल्यात जमा आहे.
आज (२९ सप्टेंबर) सामन्याचा तिसरा दिवस असून आतापर्यंत फक्त एक दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.
त्यानंतर तिसऱ्या दिवशीही मैदान ओले असल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता कानपूरच्या ग्रीन पार्कचा पर्दाफाश करताना दिसत आहे.
स्टेडियमची सेवा निकृष्ट असून येथे ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्याचे या चाहत्याने सांगितले. चाहता स्टेडियममध्ये बसून हे सर्व बोलत आहे. त्याने स्टँडमधून संपूर्ण स्टेडियमचा नजारा दाखवला आणि स्टेडियमच्या निकृष्ट सेवेबद्दल पोलखोल केली.
व्हिडिओमध्ये चाहत्याने म्हटले आहे की, "कानपूरचे हे स्टेडियम इतके जुने आहे की तेथे ड्रेनेजची व्यवस्था नाही, काहीही नाही. पाऊस अजिबात पडत नाहीये. पण तरीही खेळ सुरू होत नाही आहे. या ठिकाणी दुसरे एकादे मैदान असते तर आत्तापर्यंत कव्हर्स काढून टाकले असते आणि पाणी क्लीअर झाले असते आणि मॅच सुरू झाली असती."
तो चाहता पुढे म्हणाला, “पाऊस अजिबात नाही, कव्हर्सवर नुसते पाणी साचले आहे. मैदान निरुपयोगी आहे. इथे कानपूरमध्ये आता आणखी सामने होतील, असे आम्हाला वाटत नाही. इथली सर्व्हिस इतकी खराब आहे, काय बोलावे? .”
२७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने पहिल्या दिवसअखेर ३५ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या. पहिल्याच दिवशी पावसामुळे सामना १ तास उशिराने सुरू झाला.
त्यानंतर उपाहारादरम्यानही पावसामुळे सामना सुमारे १५ मिनिटे थांबला. यानंतर दुसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेला. आता तिसऱ्या दिवशी पावसामुळे नाही तर खराब मॅनेजमेंटमुळे सामना सुरू होऊ शकला नाही.