Pitch Invader Virat Kohli IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीवर ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. कांगारू संघाने दुसऱ्या दिवशी ३११ धावांवर आपला डाव पुढे वाढवला. स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने शानदार शतक झळकावले.
या दरम्यान, मेलबर्नच्या मैदानावर एक विचित्र घटना घडली. ही घटना दुसऱ्या दिवसाच्या ११व्या षटकात घडली, जेव्हा जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता.
वास्तविक, एक चाहता सुरक्षा रक्षकांना चकमा देत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये घुसला. चाहता धावत स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीजवळ गेला.
या चाहत्याने विराट कोहलीच्या गळ्यात हात टाकला आणि एखादा पराक्रम केल्यासारखे हात वर करून आनंद व्यक्त केला.
यानंतर काही वेळ मैदानात इकडे तिकडे पळत सुटल्यानंतर अखेर सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला पकडले. विशेष म्हणजे या चाहत्याच्या टी-शर्टवर युक्रेनचा ध्वज छापण्यात आला होता. ज्यावर इंग्रजी शब्दात 'FREE' लिहिले होते. याद्वारे तो अनेक महिन्यांपासून रशियाशी युद्धात असलेल्या युक्रेनला पाठिंबा देत होता.
विशेष म्हणजे, २०२३ च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्येही असाच एक व्यक्ती घुसला होता. तो सामनादेखील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच झाला होता. त्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल फलंदाजी करत असताना तो मैदानात घुसला होता. तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने ३११ धावसंख्येवरून डावाला सुरुवात केली आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर कांगारू संघ शेवटच्या ४ विकेट्समध्ये १५९ धावा जोडण्यात यशस्वी ठरला. बॉक्सिंग डे कसोटीत दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजीत कोणतीही धार नव्हती.
पण रवींद्र जडेजाने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत डावात एकूण ४ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या, तो १४० धावा करून बाद झाला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ४, जसप्रीत बुमराहने ३, आकाशदीपने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.