मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Watch : लाईव्ह सामन्यात चाहता चेंडू घेऊन पळाला, कॉमेंटेटर्ससह सगळेच थक्क, पाहा

Watch : लाईव्ह सामन्यात चाहता चेंडू घेऊन पळाला, कॉमेंटेटर्ससह सगळेच थक्क, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 14, 2024 08:29 PM IST

Nz vs Pak 2nd T20 : सामन्यात एक मजेदार घटना घडली. न्यूझीलंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा फखर जमान तुफानी फलंदाजी करत होता. या दरम्यान फखरने मिड-विकेटवर एक जबरदस्त षटकार मारला.

Fakhar Zaman Vs New Zealand
Fakhar Zaman Vs New Zealand (AFP)

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने २१ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली

सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकात ८ बाद १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान १९.३ षटकांत १७३ धावांवर गारद झाला.

दरम्यान, या सामन्यात एक मजेदार घटना घडली. न्यूझीलंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा फखर जमान तुफानी फलंदाजी करत होता. या दरम्यान फखरने मिड-विकेटवर एक जबरदस्त षटकार मारला. चेंडू मैदानाबाहेर रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

चेंडू उचलून पळून गेला

यानंतर एक क्रिकेट चाहता रस्त्यावर पडलेला चेंडू उचलून पळून गेला. कॉमेंटेटर्स या षटकाराचे कौतुक करत असताना चाहता चेंडू उचलून पळत असल्याचे स्क्रीनवर दिसत होते. लाईव्ह सामन्यादरम्यान अशाप्रकारे चेंडू घेऊन जाण्याची घटना क्वचितच पाहायला मिळते.

पाकिस्तानसाठी पाचव्या क्रमांकावर आलेल्या फखर जमानने २५ चेंडूत ५० धावांची तुफानी खेळी केली. २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करताना त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. पण तो आपल्या संघाला सलग दुसऱ्या पराभवापासून वाचवू शकला नाही.

बाबर आझमच्या ६६ धावा

न्यूझीलंडकडून फिन अ‍ॅलनने सर्वाधिक ७४ धावा ठोकल्या. त्याने अवघ्या ४१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकार मारले. तर गोलंदाजीत अ‍ॅडम मिलनेने सर्वाधिक ४ विकेट घेतले.

तर पाकिस्तानकडून हरिस रौफने ३८ धावांत ३ बळी घेतले. १९५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फक्त तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यामध्ये बाबर आझम (६६) आणि फखर जमान (५०) यांचा समावेश आहे.

दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. याशिवाय शाहीन शाह आफ्रिदीने २२ धावा केल्या.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi