Faf du Plessis Catch Video SA20 : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या SA20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. तो या स्पर्धेत जोहान्सबर्ग सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे.
या स्पर्धेचा एलिमिनेटर सामना जोहान्सबर्ग सुपर किंंग्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप (Sunrisers Eastern Cape vs Joburg Super Kings) यांच्यात (५ फेब्रुवारी) खेळला गेला. या सामन्यात डुप्लेसिसच्या जोहान्सबर्गला पराभवाचा सामना करावा लागला.
पण डु प्लेसिसने थरारक झेल घेऊन चर्चा मिळवली आहे. डुप्लेसिचा झेल पाहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले. वयाच्या ४० व्या वर्षी असा झेल पकडणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. डु प्लेसिसच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सनरायझर्स इस्टर्न केप संघाच्या डेव्हिड बेडिंगहॅम याचा हा झेल होता, त्याने इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने मोठा फटका मारला. हा चेंडू चौकार जाईल असे वाटत होते. पण तेथे फिल्डिंग करत असलेल्या डुप्लेसिसने हवेत झेप घेत झेल पकडला. हा सर्व प्रकार पहिल्या डावातील ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झाला.
एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने ३२ धावांनी विजय मिळवला. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील जॉबर्ग सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात जॉबर्ग सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स इस्टर्न केपने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार एडन मार्करामने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ४० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सुपर किंग्जला २० षटकांत केवळ १५२ धावा करता आल्या. यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने १७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. यादरम्यान सनरायझर्स इस्टर्न केपकडून क्रेग ओव्हरटन, लियाम डॉसन आणि ओटनील बार्टमन यांनी २-२ बळी घेतले.
संबंधित बातम्या