भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. उथप्पा याच्याविरुद्धचे वॉरंट भविष्य निर्वाह निधी (प्रोव्हिडंट फंड) प्रकरणात त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनंतर जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट पीएफ प्रादेशिक आयुक्त षडाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले असून त्यांनी कर्नाटकातील पुलकेशीनगर पोलिसांना त्वरित कारवाई करण्यास सांगितले.
रॉबिन उथप्पा सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रँड्स प्रा. लि. ही कंपनी मॅनेज करतो. या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापले गेले, पण ते त्यांच्या पीएफ खात्यात जमा केले नाहीत, असा आरोप उथप्पावर आहे. हे संपूर्ण प्रकरण २३ लाख रुपयांचे आहे.
४ डिसेंबर रोजी आयुक्त रेड्डी यांनी पोलिसांना उथप्पाविरुद्ध वॉरंट जारी करण्यास सांगितले, परंतु उथप्पाने आपला पत्ता बदलल्यामुळे ते पोलिसांकडे परत आले. अधिकारी आता त्याचा नवीन पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नियमांनुसार, कोणतीही कंपनी जी आपल्या कर्मचाऱ्यांचे पीएफ कापते, त्यांना हे पैसे त्यांच्या पीएफ खात्यात जमा करावे लागतात. तसे न झाल्यास ते कायद्याचे उल्लंघन आणि पैशाचा गैरवापर मानला जातो. उथप्पानेही तेच केले आहे. पोलीस त्याला शोधण्यात व्यस्त आहेत.
भारताकडून दीर्घकाळ खेळणारा आणि नंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून तुफानी फलंदाजी करणारा उथप्पा सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. तो आता निवृत्त खेळाडूंच्या लीगमध्ये खेळताना दिसतो. उथप्पाने अलीकडेच हाँगकाँग सिक्स स्पर्धेत भाग घेतला होता.
रॉबिन उथप्पाने भारतासाठी ४८ एकदिवसीय सामने खेळले असून ९३४ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट ९०.५९ राहिला आहे. उथप्पाने भारतासाठी एकूण १३ टी-२० सामने खेळले असून २४९ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा अर्धशतके आणि टी-20 सामन्यात एक अर्धशतक झळकावले आहे.