Womens cricket Team ex coach arrested : भारतीय महिला क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक तुषार आरोठे (Tushar Arothe) याला वडोदरा पोलिसांनी १ कोटी रुपये रोकडसह अटक केली. वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं (SOG) ही कारवाई केली. आरोठे याच्या प्रतापगंज येथील घरी मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याची माहिती आहे.
आरोठे यांच्याबद्दल संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. छाप्यातून १.०१ कोटी अशी नोंद असलेली ‘ग्रे बॅग’ जप्त करण्यात आली. क्रिकेटवर सट्टा आणि फसवणुकीच्या आरोपांचा सामना करत असलेला आरोठे याचा मुलगा ऋषी याचा देखील या बेहिशेबी रकमेशी संबंध असल्याचं समजतं.
जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबद्दल आरोठे हा पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळं त्याच्यावर आणि इतर दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत रायपतवार आणि अमित जनित अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडं ३८ लाखांची रोकड सापडली आहे.
तुषार आरोठे याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल २०१९ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यावर सट्टेबाजी केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या १९ लोकांमध्ये आरोठे याचाही समावेश होता. कालांतरानं त्याची जामिनावर सुटका झाली.
तुषार आरोठे हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक आहे. २०१७ मध्ये ICC महिला विश्वचषक अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून त्यानं काम पाहिलं होतं. आरोठे हा स्वत: क्रिकेटपटू होता. क्रिकेट कारकीर्दीत बडोदा संघासाठी त्यानं ५१ लिस्ट-ए सामने आणि ११४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, त्यानं बडोद्यासाठी २२५ बळी घेतले आहेत. तर, त्याच्या नावावर ६,१०५ धावा आहेत. हा अष्टपैलू खेळाडू २००३ मध्ये निवृत्त झाला. २००८ मध्ये भारतीय महिला संघाच्या कोचिंग स्टाफचा सदस्य झाला. २०१८ मध्ये काही अनपेक्षित घडामोडींनंतर त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्याचं नाव आलं आहे.
संबंधित बातम्या