विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. हे आकडेवारीच्या आधारेही सिद्ध होते. आता टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी मोठे विधान केले असून विराटने कर्णधारपद कायम ठेवायला हवे होते, असे म्हटले आहे.
२०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराटने कर्णधारपद सोडले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४० कसोटी सामने जिंकले आहेत.
एका पॉडकास्टवर चर्चा करताना संजय बांगर म्हणाले, “मला वैयक्तिकरित्या वाटते की विराट कोहलीने कमीत कमी दीर्घ कालावधीसाठी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवायला हवे होते. त्याने ६५ पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.”
संजय बांगर यांनी पुढे सांगितले की विराट कोहलीची मानसिकता संघाला परदेशात जास्तीत जास्त सामने जिंकण्यास मदत करण्याची होती, कारण त्यावेळी भारताने घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले होते. भारतीय संघ होम ग्राउंडवर सातत्याने जिंकत होता. पण भारताने परदेशी खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करावी अशी कोहलीची इच्छा होती".
विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० वेळा संघाने विजय मिळवला. विराट हा केवळ भारताला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणारा कर्णधार नाही तर त्याची विजयाची टक्केवारी एमएस धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा खूपच चांगली आहे.
२०१४/२०१५ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कोहलीने पहिल्यांदा टीम इंडियाची कमान सांभाळली. त्यानंतर, कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी ५४.८० च्या सरासरीने ५८६४ धावा केल्या आहेत.