टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची १.६ कोटी रुपयांची फसवणूक करणारा हरियाणाचा माजी क्रिकेटपटू मृणाक सिंग याला अटक करण्यात आली आहे. मृणांक याच्या दिल्ली विमानतळावरून मुसक्या आवळण्यात आल्या. तो हाँगकाँगला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
मृणांक हरियाणाकडून अंडर-१९ क्रिकेट खेळला आहे. तो फरिदाबादचा रहिवासी असून त्याचे वय २५ वर्षे आहे. ऋषभ पंत व्यतिरिक्त मृणांकने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. मृणांकने आलिशान हॉटेल्स चालकांनाही चुना लावला आहे.
मृणांकने स्वतःला कर्नाटकचा एडीजी सांगून अनेक लोकांची आणि हॉटेल्सची फसवणूक केली आहे.
याशिवाय मृणांक हा आयपीएल खेळणारा क्रिकेटपटू असल्याचे भासवून महागड्या हॉटेलमध्ये राहायचा आणि संपूर्ण बिल एकदाच भरणार, असे सांगून बिल न भरताच निघून जायचा. मृणांक स्वतःला मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर असल्याचे सांगायचा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत आणि मृणांक सिंग २०१३-१४ मध्ये एका कॅम्पमध्ये भेटले होते. यानंतर मृणांकने २०२०-२१ च्या सुमारास ऋषभ पंतशी पुन्हा संपर्क साधला आणि सांगितले की तो लक्झरी वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करत आहे.
त्यावेळी ऋषभ पंतने हरियाणाच्या या माजी क्रिकेटपटूकडून काही वस्तू खरेदी केल्या. पण या वस्तू पंतला कधीच मिळाल्या नाहीत. वस्तूंची मागणी केल्यानंतर मृणांकने पंतला १.६३ कोटी रुपयांचा चेक दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. अशाप्रकारे ऋषभ पंत याच्यासोबत फसवणुक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले.
फसवणूकीच्या प्रकरणात मृणांकला अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पंचकुला आणि मुंबई पोलिसांनी मृणांकला फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली होती.