WI vs ENG Highlights : एव्हिन लुईसच्या वादळात इंग्लिश संघ उडाला, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs ENG Highlights : एव्हिन लुईसच्या वादळात इंग्लिश संघ उडाला, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा

WI vs ENG Highlights : एव्हिन लुईसच्या वादळात इंग्लिश संघ उडाला, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा

Nov 01, 2024 11:19 AM IST

WI vs ENG Highlights : वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एव्हिन लुईसच्या तुफानी खेळीच्या जोरावर ८ गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडचा संघ अवघ्या २०९ धावांवर आटोपला.

WI vs ENG Highlights : एव्हिन लुईसच्या वादळात इंग्लिश संघ उडाला, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा
WI vs ENG Highlights : एव्हिन लुईसच्या वादळात इंग्लिश संघ उडाला, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा (AP)

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अँटिग्वा येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान संघाचा सलामीवीर एव्हिन लुईसने इंग्लिश गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडचा सहड पराभव केला.

इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते, पावसामुळे सामना थांबेपर्यंत एव्हिन लुईसच्या वादळी खेळीच्या जोरावर यजमानसंघाने २५.५ षटकांत २ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. हा सामना वेस्ट इंडिजने डीएलएस नियमाच्या आधारे ८ गडी राखून जिंकला. एव्हिन लुईसने ६९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ९४ धावांची तुफानी खेळी केली, तो अवघ्या ६ धावांनी शतकापासून वंचित राहिला.

तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना सुरुवात मिळाली पण त्यांना या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या डावात करता आले नाही. १०० धावांच्या आत ४ गडी गमावल्यानंतर कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोन (४८) आणि सॅम करन (३७) यांनी काही काळ संघाची धुरा सांभाळली, पण ते बाद होताच संघ २०९ धावांवर आटोपला. इंग्लंडचे फलंदाज पूर्ण ५० षटकेही टिकू शकले नाहीत.

यानंतर २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने ब्रँडन किंग (३०) आणि एव्हिन लुईस यांच्या जोडीने धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी १९.१ षटकांत ११८ धावा जोडल्या. सुरुवातीच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजचा विजय निश्चित झाला होता. लुईस २३ व्या षटकात बाद झाला. यानंतर कीसी कार्टी आणि कर्णधार शाई होप यांनी वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. गुडकेश मोतीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर २ नोव्हेंबररोजी खेळला जाणार आहे.

Whats_app_banner