IND vs ENG 1st Test Day 4 : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला चौथ्या डावात विजयासाठी २३१ धावा करायच्या होत्या, परंतु संपूर्ण संघ केवळ २०२ धावांवर गारद झाला.
या विजयासह इंग्लंडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
भारताला विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली होती. जेस्वाल आणि रोहित शर्मा यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. पण टॉम हार्टलीने यशस्वीला बाद करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर हार्टलीने शुभमन गिल, कर्णधार रोहित आणि अक्षर पटेल यांना बाद करत भारताचे टेन्शन वाढवले. केएल राहुलदेखील फार काळ टिकला नाही आणि जो रूटचा बळी ठरला. त्यानंतर रवींद्र जडेजाला बेन स्टोक्सने धावबाद केले.
श्रेयस अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो जॅक लीचच्या फिरकीत अडकला. ११९ धावांत ७ गडी बाद झाल्यानंतर के.एस.भारत आणि आर. अश्विन यांनी ८ व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.
हे दोन्ही खेळाडू मिळून भारताला विजय मिळवून देतील असे वाटत होते, पण टॉम हार्टलेने दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या.
तत्पूर्वी, आज चौथ्या दिवशी (२८ जानेवारी) इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांवर आटोपला. ऑली पोपने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी शानदार १९६ धावा केल्या. पोपने २७८ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार मारले.
पोपशिवाय बेन डकेटने ४७ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ आणि आर. अश्विनने ३ विकेट घेतल्या. इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे १९० धावांची आघाडी होती.