जॉस बटलर याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत विजयाची चव चाखली आहे. राजकोटमध्ये इंग्लंडला पहिला विजय मिळाला आहे. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ जानेवारी) खेळला गेला, ज्यामध्ये इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. मात्र, पहिले दोन सामने जिंकूनही भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पुढे आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ १४५ धावाच करता आल्या. या विजयासह इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केले आहे.
हार्दिक पांड्याने राजकोटमध्ये भारताकडून ४० धावांची सर्वोच्च खेळी केली. तर वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले. तर इंग्लंडकडून बेन डकेटने अर्धशतक झळकावले.
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४५ धावाच करता आल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने ४० धावांची खेळी केली. त्याने २ षटकार आणि १ चौकार लगावला. अक्षर पटेलने १५ धावा जोडल्या. त्याने २ चौकार मारले. मोहम्मद शनीने एका षटकाराच्या मदतीने ७ धावा केल्या. अशा प्रकारे भारताला २६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. सॅमसमनंतर अभिषेक शर्माची विकेट पडली. १४ चेंडूत २४ धावा करून तो बाद झाला. अभिषेकने ५ चौकार मारले. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीला आला. तो १८ धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर अवघ्या ६ धावा करून तंबूत परतला.
संघाचा सलामीवीर म्हणून बेन डकेट फलंदाजीला आला. त्याने २८ चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार मारले. लिव्हिंग्स्टनने २४ चेंडूंचा सामना करत ४३ धावा केल्या. त्याने ५ षटकार आणि १ चौकार लगावला. कर्णधार जोस बटलरने २४ धावांचे योगदान दिले. फिलिप सॉल्ट ५ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या.
तर भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने ५ बळी घेतले. त्याने ४ षटकात २४ धावा दिल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या आहेत. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी १-१ बळी घेतला.
संबंधित बातम्या