इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटची वेगळीच क्रेझ आहे. विशेषतः लॉर्ड्स किंवा मँचेस्टर येथे कसोटी सामना खेळला जात असेल तर चाहते मोठ्या संख्येने सामना पाहायला मैदानात येतात. या मैदानांवर जेव्हा जेव्हा कसोटी सामना होतो तेव्हा प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
अनेक वेळा कसोटीच्या पाचही दिवस संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल राहते. असेच दृश्य इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात मँचेस्टर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळत आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात (२१ ऑगस्ट) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने ३५८ धावा करत आघाडी घेतली.
मात्र, हा सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता पूर्णपणे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या चाहत्याला पाहून इंग्लंड क्रिकेट संघाचे मार्गदर्शक पॉल कॉलिंगवूडही खूप प्रभावित झाले होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२३ ऑगस्ट) स्टेडियममध्ये सामना पाहणाऱ्या एका चाहत्याने एका हाताने झेल घेत सर्वांना आश्चर्यचकित केले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी युवा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथने शानदार शतक झळकावून इंग्लंडसाठी इतिहास रचला. इंग्लंडकडून कसोटीत शतक झळकावणारा तो सर्वात तरुण यष्टिरक्षक फलंदाज ठरला.
तिसऱ्या दिवशी, केवळ जेमी स्मिथनेच प्रसिद्धी मिळवली नाही तर प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका चाहत्यानेही चर्चा मिळवली. वास्तविक, इंग्लंडच्या पहिल्या डावातील ८३ व्या षटकात श्रीलंकेची गोलंदाज असिथा फर्नांडोने मार्क वुडला एक शॉर्ट चेंडू टाकला.
वुडने या शॉर्ट बॉलचा फायदा घेतला आणि जोरदार पुल शॉट खेळला, ज्यामुळे चेंडू डीप मिड-विकेटच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये गेला. यावेळी हा बॉल पकडण्यासाठी अनेक प्रेक्षकांमध्ये स्पर्धा झाली पण शेवटी एका प्रेक्षकाने एका हाताने चेंडू झेलला. या प्रेक्षकाच्या एका हातात बिअरचा मोठा ग्लास काठोकाठ भरलेला होता. या प्रेक्षकाने एका हाताने अप्रतिम झेल तर घेतलाच पण आपल्या बिअरचा एक थेंबही खाली पडू दिला नाही.
अशातच स्टेडियममध्ये बसलेले सर्व प्रेक्षक हा झेल पाहून थक्क झाले. आता या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंड क्रिकेटने या झेलचा व्हिडिओ X वर शेअर केला आहे.
हा झेल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकच नव्हे तर डगआऊटमध्ये बसलेले इंग्लंड संघाचे मार्गदर्शक पॉल कॉलिंगवूड देखील आश्चर्यचकित झाले आणि एका हातात बिअरचा ग्लास धरून हा शानदार झेल घेणाऱ्या प्रेक्षकांचे कौतुक करू लागले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथने दमदार फलंदाजी करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. तिसऱ्या दिवशी स्मिथने १११ धावा केल्यामुळे इंग्लंड संघाने ३५८ धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंड संघाने १२२ धावांची आघाडी मिळवली.