भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. पाहुण्या संघ इंग्लंडला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघ २-० ने मागे पडला आहे.
आता मालिकेतील हा तिसरा सामना त्याच्यासाठी करो किंवा मरो असा असणार आहे. राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडचा संघ जिंकू शकला नाही, तर या मालिकेत त्यांच्यासाठी काहीच उरणार नाही. अशा स्थितीत इंग्लंडने या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडने संघात कोणताच बदल केलेला नाही आहे. दुसऱ्या T20 मध्ये संघात बदल केले होते, पण कर्णधार जोस बटलर याने तिसऱ्या टी-20 साठी आपला विचार बदललेला नाही.
भारताविरुद्धच्या या टी-२० मालिकेत इंग्लंडची टॉप ऑर्डर खराब फॉर्मात आहे. कर्णधार जोस बटलर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आलेला नाही.
अशा स्थितीत तिसऱ्या टी-२० मध्येही इंग्लंडसमोर फलंदाजीचे मोठे आव्हान असेल. जोस बटलरनेही चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४५ धावांची दमदार खेळी केली होती.
याशिवाय गोलंदाजी हादेखील इंग्लंडसाठी चिंतेचा विषय आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरत आहे. आर्चरने कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात नक्कीच प्रभाव पाडला, परंतु चेन्नईत त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ६० धावा दिल्या आणि त्याला एकच विकेट मिळाली.
तिसऱ्या टी-20 साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन क्रर्स, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि आदिल रशीद.
संबंधित बातम्या