India Vs England 2nd Test Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे.
पण आता दुसऱ्या कसोटीच्या सामन्याच्या एक दिवसआधीच इग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे पुनरागमन झाले आहे. तर फिरकी गोलंदाज शोएब बशीरला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
दुखापतग्रस्त जॅक लीच आणि मार्क वुड यांना संघातून वगळण्यात आले आहे.
इंग्लंड संघात दोन्ही बदल गोलंदाजीत झाले आहेत. फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पहिल्या सामन्यात मार्क वुड हा एकमेव वेगवान गोलंदाज संघात होता. त्याला एकही विकेट घेता आली नाही. आता त्याच्या जागी अनुभवी जेम्स अँडरसनला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. या सामन्यात अँडरसनला आपले ७०० कसोटी बळी पूर्ण करण्याची संधी आहे.
दरम्यान, भारताने या सामन्यासाठी आपली प्लेइंग ११ अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु टीम इंडियामध्ये दोन बदल निश्चित आहेत. लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. या दोन खेळाडूंच्या जागी सरफराज खान किंवा रजत पाटीदार आणि गोलंदाजीत कुलदीप यादव यांना संधी मिळू शकते.