इंग्लंडच्या सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या मोईन अली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑफस्पिन अष्टपैलू मोईनने २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडकडून पदार्पण केले होते.
यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताविरुद्धचा सामना मोईन अलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
मोईनचे वडील मुनीर अली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता, पण नंतर ते पाकिस्तानात गेले. यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी मुनीर आपल्या भावांसोबत इंग्लंडला परतले.
मोईन अलीसाठी क्रिकेटर बनण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे कुटुंब खूप गरीब होते. अनेकवेळा त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नसायचे.
कधीकधी केवळ सँडविच आणि काकडी खाऊन तो दिवस काढायचा. त्याचे वडील ड्रायव्हर होते. यासोबतच तो त्याचा भाऊ शाबीर याच्यासोबत घरोघरी कोंबड्या विकायचा. यामुळे काही अतिरिक्त पैसे मिळण्यास मदत झाली. ते ज्या परिस्थितीतून जात होते, त्याच परिस्थितीत त्यांच्या मुलांनी राहावे असे त्यांचे वडील मुनीर अली यांना वाटत नव्हते.
मोईन अलीला क्रिकेटर बनवण्यात त्याचे वडील मुनीर अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुनीर यांनी स्वतः मोईन अली आणि त्याचा भाऊ कादीर अली यांना प्रशिक्षण दिले. मोईन अली जेव्हा १३ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी मोईनकडे फक्त दोन वर्षे मागितली.
एका मुलाखतीत मुनीर अली यांनी सांगितले होते, "जेव्हा मोईन १३ वर्षांचा होता, तेव्हा मी त्याच्याशी करार केला होता. मी म्हणालो, 'मला तुझ्या आयुष्यातील २ वर्षे दे आणि त्यानंतर तुला पाहिजे ते करू.' या दोन वर्षात मित्र नाही, मैत्रीण नाही... फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट'.
मोईन अलीसोबत त्याचा चुलत भाऊ कबीर अलीही इंग्लंडकडून खेळला आहे. त्याला १ कसोटी आणि १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली.
पण त्याचा भाऊ कादीर अलीला इंग्लंडकडून संधी मिळाली नाही. त्याने विविध काउंटी संघांसाठी १०३ प्रथम श्रेणी सामने तसेच ६४ लिस्ट ए आणि २७ टी-20 सामने खेळले.
मोईनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने १३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३५५ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके केली. मोईनने या फॉरमॅटमध्ये १११ विकेट्सही घेतल्या आहेत.
सोबतच त्याने इंग्लंडकडून ६८ कसोटी सामन्यांमध्ये ३०९४ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ शतके आणि १५ अर्धशतके केली. सोबतच कसोटीत २०४ विकेट्स घेतल्या आहेत.
मोईनने ९२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२२९ धावा केल्या आहेत. यासोबतच ५१ विकेट्सही घेतल्या आहेत.