टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये इंग्लंडने गुरुवारी (२० जून) वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून विजय मिळवला आणि गट २ च्या सुपर-८ फेरीतील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. त्याच वेळी, यजमान वेस्ट इंडिज -१.३४३ च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर घसरला आहे.
दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा आहे, त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध विजय मिळवला. त्यांचा नेटर रनरेट +०.९०० आहे. तिसऱ्या स्थानावर सहयजमान अमेरिका आहे, त्यांचा नेट रन रेट -०.९०० आहे. चारही संघांना अजून २ सामने खेळायचे आहेत.
तत्पूर्वी सेंट लुसिया येथील डॅरेन सेमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने २० षटकांत ४ गडी गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १७.३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या आणि सामना ८ गडी राखून जिंकला.
१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने या सामन्यात दमदार सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी झाली. रोस्टन चेसने आठव्या षटकात बटलरला एलबीडब्ल्यू आऊट केले. २२ चेंडूत २५ धावा करून तो बाद झाला. मोईन अलीच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रसेलने मोईन अलीला जॉन्सन चार्ल्सकरवी झेलबाद केले.
अलीला केवळ १३ धावा करता आल्या. यानंतर जॉनी बेअरस्टोने सुत्रे हाती घेतली. त्याने फिल सॉल्टसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची नाबाद भागीदारी केली. डावाच्या १६व्या षटकात सॉल्टने रोमॅरियो शेफर्डला लक्ष्य केले आणि त्याने या षटकात ३० धावा ठोकल्या.
या सामन्यात सॉल्ट ८७ धावांवर नाबाद राहिला तर बेअरस्टो ४८ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून फक्त रसेल आणि चेस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाला ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी दमदार सुरुवात करून दिली. मात्र, पाचव्या षटकात मांडीच्या दुखापतीमुळे किंग निवृत्त झाला. तो १३ चेंडूत २३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर निकोलस पुरनने चार्ल्ससोबत पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली जी मोईन अलीने १२व्या षटकात मोडली. त्याने सलामीवीर चार्ल्सला ९४ धावांवर बाद केले. चार्ल्स ३४ चेंडूत ३८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोव्हमन पॉवेलने खळबळ उडवून दिली. त्याने पूरनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. लियाम लिव्हिंगस्टोनने १५ व्या षटकात पॉवेलला बाद केले. त्याला ५ षटकारांसह ३६ धावा करता आल्या. त्याचवेळी पुरनने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३६ धावा काढल्या. या सामन्यात रसेलला एकच धाव करता आली. तर, रदरफोर्ड २८ धावांवर नाबाद राहिला आणि रोमॅरियो शेफर्ड ५ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
संबंधित बातम्या