कॅरिबियन प्रीमियर लीगशी (CPL 2024) संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओने जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये दिग्गज ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो याने आंद्रे रसेल याला त्याचे गोल्डन शूज गिफ्ट केले आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये रसेलने हे शूज परिधान केले आणि नेटमध्ये सरावही केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, एक अष्टपैलू खेळाडू आपला वारसा दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूकडे सोपवत आहे.
या व्हिडिओ क्लिपमध्ये ड्वेन ब्राव्हो म्हणाला, "लेडीज अँड जेंटलमन, एक अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूकडे आपला वारसा सोपवत आहे. मी माझे गोल्डन शूज 'जनरल'ला देत आहे."
या व्हायरल व्हिडीओमध्ये रसेलने सांगितले की, तो हे शूज घालूनच गोलंदाजी करणार आहे आणि ब्राव्होबाबत आदर दाखवण्यासाठी त्याने शूजला हाताने स्पर्श केला आणि नंतर त्याचे चुंबनही घेतले.
ड्वेन ब्राव्होने ३१ ऑगस्ट रोजी सर्व प्रकारच्या T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले की तो सीपीएल २०२४ च्या रूपाने आपली शेवटची व्यावसायिक स्पर्धा खेळत आहे.
याआधी त्याने २०२३ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती जाहीर केली होती. २०२१ च्या टी-20 विश्वचषकानंतर ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
CPL २०२४ बद्दल बोलायचे झाले तर ड्वेन ब्राव्होचा संघ त्रिनबागो नाइट रायडर्स सध्या ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शेवटच्या सामन्यात रायडर्सने सेंट लुसिया किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. या संघाचा पुढील सामना १३ सप्टेंबर रोजी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बार्बाडोस रॉयल्सशी होणार आहे.