प्रख्यात क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज (६ फेब्रुवारी) दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या (७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
संझगिरी हे सिव्हिल इंजिनीयर होते आणि मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. संझगिरी यांच्या निधनावर क्रिकेटसह राजकीय वर्तुळातून अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
संझगिरी यांनी स्तंभलेखक, लेखक, सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे. जवळजवळ ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी लिखान केले आहे. विशेत: त्यांनी मराठीत इंग्रजीमध्ये स्तंभलेखन केले आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांनी १९७० च्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या लेखन कारकीर्दीला सुरुवात केली होती. भारताने १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संझगिरी यांनी 'एकच षटकार' हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते. याचे ते संपादक होते.
फेसबूकवरही ते क्रिकेट आणि चित्रपटांविषयी लिहायचे, हे लिखान युवा पिढीला खूप आवडायचे. द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईतील दादर येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांनी रामनारायण रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी व्हीजेटीआय माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
संझगिरी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून काम सुरू केले आणि २००८ मध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले. त्याबरोबर त्यांनी क्रिकेटवरील लिखाण सुरू ठेवले होते.
द्वारकानाथ संझगिरी स्तंभलेखनासोबतच प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.
संबंधित बातम्या