बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या स्पर्धेतील संघ दरबार राजशाहीच्या परदेशी खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. या संघातील परदेशी खेळाडूंना त्यांचे मानधन मिळाले नाही, यामुळे या खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला.
विशेष म्हणजे, यापूर्वी संघातील स्थानिक खेळाडूंनीही सामना न खेळण्याची धमकी दिली होती. आता विदेशी खेळाडूंनी मैदानात उतरण्यास नकार दिला. तथापि, यामुळे संघ फ्रँचायझीमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही.
कारण, आपल्या परदेशी खेळाडूंची पर्वा न करता संघाने त्यांच्याशिवाय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि सामना खेळला.
बांगलादेश प्रीमियर लीगच्या नियमांनुसार, चालू हंगामात, प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान दोन परदेशी खेळाडूंचा समावेश करावा लागतो.
पण, २६ जानेवारीला रंगपूर रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दरबार राजशाहीने असे केले नाही. संघाचा कर्णधार तस्किन अहमद याने सांगितले की, त्याच्या संघात ४ बदल करण्यात आले आहेत आणि संघात आज एकही विदेशी खेळाडू खेळणार नाही.
मात्र, यात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या तांत्रिक समितीनेही परदेशी खेळाडूंविना खेळण्याची परवानगी दिली. दरबार राजशाहीने यासाठी विशेष विनंती करून परवानगी मागितल्याचे बीसीबीने सांगितले.
बांगलादेश प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने कोणत्याही परदेशी खेळाडूशिवाय आपली प्लेइंग इलेव्हन बनवली.
ESPNcricinfo नुसार दरबार राजशाहीच्या परदेशी खेळाडूंना फक्त एक चतुर्थांश पेमेंट करण्यात आले आहे. तर BCB च्या नियमांनुसार त्यांना स्पर्धेदरम्यान ७५ टक्के मानधन देण्याचे नमूद केले आहे. फ्रेंचायझीने स्थानिक खेळाडूंना विरोध करेपर्यंत काहीही दिले नव्हते.
दरबार राजाशाहीच्या विदेशी खेळाडूंमध्ये मोहम्मद हॅरिस, रायन बर्ल, मार्क अडायर, मिगेल कमिन्स, आफताब आलम, लाहिरू समाराकुन या नावांचा समावेश आहे. त्यापैकी, अष्टपैलू रायन बर्ल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि या हंगामात सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये टॉप ३ मध्ये त्याचा समावेश आहे.
संबंधित बातम्या