दुलीप ट्रॉफी २०२४ सुरू होण्याआधीच टीम डी ला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातून बाहेर पडला आहे. किशन दुखापतग्रस्त झाल्याची बातमी आहे, जो श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम डी चा भाग होता. आता त्याच्या जागी संजू सॅमसनला संघात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
संजू सॅमसनचा याआधी जाहीर केलेल्या ४ संघांमध्ये समावेश नव्हता, पण इशान किशनला वगळल्यास त्याला टीम डी मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, दुलीप ट्रॉफीच्या पुढील सामन्यांमध्ये किशन खेळू शकतो. दुलीप ट्रॉफीतील कामगिरीच्या आधारेच बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. टीम डीचा पुढचा सामना १२ सप्टेंबरला अनंतपूरमध्ये टीम ए विरुद्ध होणार आहे.
अलीकडेच चेन्नईतील बुची बाबू स्पर्धेत इशान किशन झारखंडकडून खेळला, पण त्याचा संघ लीग टप्प्याच्या पुढे प्रगती करू शकला नाही. किशनने या स्पर्धेत दोन सामने खेळले, ज्यात त्याने पहिल्या सामन्यात शतक (११४) आणि दुसऱ्या सामन्यात ४१ धावा केल्या.
इशान किशनची दुलीप ट्रॉफीमध्ये झालेली निवड हेच द्योतक होते की, निवडकर्ते त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यास तयार आहेत. मात्र आता त्याच्या दुखापतीमुळे याप्रकरणी निवड समिती काय निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादवही दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याला अलीकडेच बुची बाबू स्पर्धेत हाताला दुखापत झाली होती. याशिवाय रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हेही या स्पर्धेतून बाहेर आहेत.
दुलीप ट्रॉफीसाठी टीम डी : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत , सौरभ कुमार.