
Dubai Pitch Report Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबईत महामुकाबला रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान यांना नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने पडावा अशी अपेक्षा असेल.
अशा स्थितीत, आपण दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करायची की प्रथम गोलंदाजी करायची हे आकडेवारीवरून समजावून घेऊ.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दव नाही, त्यामुळे रात्रीही गोलंदाजांना कोणतीही अडचण येत नाही. रविवारी जेव्हा रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान नाणेफेकीला येतील, तेव्हा ते नाणे त्यांच्या बाजूने पडावे अशी प्रार्थना करतील. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १० सामन्यांची आकडेवारी पाहिली तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ७ वेळा विजय मिळवला आहे.
दुबईच्या या स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण ५८ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ३५ सामने संघाने प्रथम गोलंदाजी करत जिंकले आहेत. हे पाहता, असे म्हणता येईल, की दुबईत जो प्रथम गोलंदाजी करेल त्याच्या विजयाची अधिक शक्यता आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने एकूण ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ६ सामने जिंकले आहेत तर फक्त १ सामना गमावला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत.
दुबईच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ती फलंदाजांना अधिक मदत करते. तथापि, येथे फिरकीपटूंची भूमिका मोठी असते कारण मधल्या फळीत धावा काढणे येथे कठीण काम असते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३२५ धावांपर्यंत मजल मारली तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढेल.
संबंधित बातम्या
