Ranji Trophy Match Bihar Vs Karnataka : भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२४ चे सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यानची एक विचित्र घटना समोर आली आहे. २६ ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली, ज्यामध्ये बिहार आणि कर्नाटक यांच्यातील लढतीचाही समावेश होता.
पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी बिहारचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला. तर कर्नाटकने बिनबाद १६ धावा केल्या. पण यानंतर दुसऱ्या दिवसाच्या (२७ ऑक्टोबर) खेळात पावसाचा अडथळा आला.
खरे तर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाटणा आणि बिहारमधील अनेक भागात दाना चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला. मोईन उल हक स्टेडियम परिसरातही रात्री उशिरा मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे मैदान ओले झाले.
काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड-अफगाणिस्तान कसोटी सामन्यात मोठ्या पंख्याच्या साह्याने ग्रेटर नोएडातील खेळपट्टी कोरडी करण्यात आली होती. अशा स्थितीत मोईन उल हक स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी याहून वेगळी आणि विचित्र शक्कल लढवली, ज्याची संपूर्ण क्रिकेट जगतात चर्चा रंगली आहे.
पाटण्याच्या मोईन उल हक स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी सुकवण्यासाठी पंख्याचा नाही तर चक्क शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला आहे.
बिहार विरुद्ध कर्नाटक सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी शेणाच्या गोवऱ्या एका ट्रेमध्ये ठेवण्यात आल्या आणि त्यांना आग लावण्यात आली. गोवऱ्यांच्या उष्णतेमधून खेळपट्टी कोरडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
पण या विचित्र प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. लोकांनी बिहार क्रिकेट असोसिएशनलाच नव्हे तर बीसीसीआयलाही चांगलेच ट्रोल केले. भारताच्या अनेक जुन्या मैदानांची अशीच अवस्था आहे.
बिहार आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात तिसऱ्या दिवसाचा (२८ ऑक्टोबर) खेळ संपेपर्यंत कर्नाटकने ७ गडी गमावून २८७ धावा केल्या आहेत. कर्नाटककडून कर्णधार मयंक अग्रवालने १०५ धावांची शतकी खेळी खेळली आणि संघाची एकूण आघाडी १४४ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
संबंधित बातम्या