Stock Split news in marathi : फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडनं शेअर्सचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीच्या शेअर्सचं ५ भागांमध्ये विभाजन होणार आहे. यासाठी कंपनीनं रेकॉर्ड डेट जाहीर केली असून ही तारीख याच महिन्यात आहे. कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत ६६३५.५० रुपये आहे.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ५ रुपये अंकित मूल्य असलेल्या शेअरची पाच भागांमध्ये विभागणी केली जाणार आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ५ रुपयांवरून १ रुपयांपर्यंत खाली येईल. यासाठी २८ ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या दिवशी कंपनीचे शेअर्स ५ भागांमध्ये विभागले जातील. या दिवशी ज्यांच्या खात्यात कंपनीचे शेअर्स असतील त्यांना स्प्लिटचा लाभ मिळेल.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं दोन महिन्यांपूर्वीच गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता. जुलै महिन्यात कंपनीचा शेअर एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यवहार झाला होता. त्यावेळी कंपनीनं प्रति शेअर ४० रुपये लाभांश दिला. तर २०२३ मध्ये कंपनीनं प्रति शेअर ४० रुपये लाभांश दिला होता.
गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत ६ महिन्यांत केवळ ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या महिनाभरात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे समभाग २.३ टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७१०१ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५२१२.१० रुपये आहे.
संबंधित बातम्या