यशस्वीने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले आहे. याआधी यशस्वीने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावातही २०९ धावा केल्या होत्या. आता सलग दुसऱ्या कसोटीत दुहेरी शतक झळकावून त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याला भविष्यातील स्टार का मानले जात आहे.
२२ वर्षांचा यशस्वी जैस्वाल ज्याला स्पर्श करत आहे, त्याचे सोने होताना दिसत आहे. जैस्वालची बॅटधावा करत नाही तर आग ओकत आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.
जैस्वालने २३१ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १४ चौकार आणि १२ षटकार मारले. सोबतच जैस्वालने एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटीत एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे.
दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केल्यानंतर यशस्वी १०४ धावांच्या स्कोअरवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याला पाठदुखीचा त्रास जाणवत होता. पण चौथ्या दिवशी तो फलंदाजीला येणार नाही असे वाटत होते. पण तो फलंदाजीला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.
जैस्वाल २३६ चेंडूत २१४ धावा करून नाबाद राहिला. तर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सरफराज खानने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात ६२ धावा केल्यानंतर तो धावबाद झाला होता. तर दुसऱ्या डावात सरफराज ६८ धावांवर नाबाद राहिला.
भाररताने आपला दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला होता. टीम इंडियाकडे १२६ धावांची आघाडी होती. अशाप्रकारे इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.