भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून सुरू कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ नुकताच कानपूरमध्ये पोहोचला. विराट कोहली, रिषभ पंत, प्रशिक्षक गौतम गंभीर हेही सोबत होते. अपेक्षेप्रमाणे या सर्वांचं जोरदार स्वागत झालं. यावेळी विराट कोहलीसोबत घडलेला एक किस्सा सध्या चर्चिला जात आहे.
हॉटेलच्या लॉबीत प्रवेश करताच विराटला भेटण्यासाठी लोकांनी गर्दी केली. कोहलीच्या कपाळावर टिळा लावण्यात आला. भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणि रुद्राक्ष देऊन त्याचं स्वागत करण्यात आले.
स्वभावानं अत्यंत चांगला असलेला विराट कोहली हा त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. मग ते सेल्फी घेण्याची विनंती असो किंवा ऑटोग्राफ असो. परंतु यावेळी थोडं वेगळं घडलं. कानपूरमध्ये झालेली गर्दी आणि स्वागत इतकं जोरदार होतं की विराटला चाहत्यांशी हस्तांदोलन करण्यास नकार द्यावा लागला.
हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यानं कोहलीकडं हस्तांदोलनासाठी विनंती केली. मात्र, त्यावेळी विराटच्या एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात पुष्पगुच्छ होता. त्यामुळं त्यानं हस्तांदोलनास नकार दिला. ‘सर, सिर्फ दो हाथ है… (मला फक्त दोन हात आहेत) असं तो म्हणाल. मात्र, दुसऱ्याच क्षणी त्यानं 'थँक यू’ म्हणत चाहत्याला खूष केलं.
चेन्नईतील पहिल्या कसोटीत विराटची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. त्यानं पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १७ धावा केल्या. त्यामुळं या कसोटीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर विराटनं २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केवळ एक कसोटी सामना खेळला असून त्यानं दोन डावात २७ धावा केल्या आहेत. नुकतीच पार पडलेली चेन्नई कसोटी सामना हा भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरचा ८ महिन्यांनंतरचा विराटचा पहिलाच कसोटी सामना होता. आफ्रिकेतील सेंच्युरियन कसोटीत विराटनं ७६ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव फेब्रुवारी-मार्चमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध च्या पाच सामन्यांच्या मालिकेत खेळू शकला नव्हता. तो दुसऱ्यांदा बाबा बनल्याचं कारण त्यामागे होतं. आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळण्यासाठी कोहली वेळेवर परतला आणि त्यानं या मोसमात ७४० पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर तो टी-२० विश्वचषक खेळला. त्यातील शेवटच्या सामन्यात ७६ धावांची विजयी खेळी केली. त्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत दुसरं विजेतेपद पटकावलं.