भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने २८० धावांनी जिंकली. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. भारताच्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा लंचपूर्वी संघ २३४ धावांवर गडगडला.
भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. तर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर गारद झाला. आर अश्विन भारताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या आणि या सामन्याच्या पहिल्या दमदार फलंदाजी करत शतकही झळकावले.
दरम्यान, चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने कार अपघातानंतर पुनरागम केले. पंतने माघारी परतताच शानदार शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर पंत चर्चेचा विषय ठरला. तसेच, काही उतावीळ चाहते आणि क्रिकेट विश्लेषक त्याची आणि धोनीची तुलना करत आहेत.
पण टीम इंडियाचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याला ही तुलना खटकली आहे. त्याने पंत आणि एमएस धोनी यांच्यातील तुलनेवर मोठं विधान केले आहे.
ऋषभ पंत आणि एमएस धोनी यांच्या तुलनेवर कार्तिक म्हणाला की, ज्याने केवळ ३४ कसोटी सामने खेळले त्याला महान म्हणणे योग्य नाही. 'क्रिकबझ'वर बोलताना कार्तिक म्हणाला की पंत आणि धोनीची तुलना अस्वीकार्य आहे.
कार्तिक म्हणाला, की “तो फक्त ३४ कसोटी खेळला आणि भारतासाठी तो एक सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे, असे म्हणणे अस्वीकार्य आहे. कारण यश मिळवण्यासाठी आणि काही गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपणही थोडा काळ वाट पाहू लगेच निकाल लावू नये.”
कार्तिक पुढे म्हणाला, “यष्टीरक्षक म्हणून धोनीला कमी लेखू नका. त्याने केवळ चमकदार कामगिरी केली नाही, तर गरज असेल तेव्हा फलंदाजीत दमदार कामगिरी केली. तसेच, कर्णधार म्हणून त्याचे योगदान न विसरता येणारे आहे. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्याची महान खेळाडूशी तुलना करतो, तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.”
पंतने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ३४ कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांच्या ५८ डावांमध्ये त्याने ४४.७९ च्या सरासरीने २४१९ धावा केल्या आहेत. त्याने ६ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १५९* धावा होती. सध्या पंत हा भारतीय कसोटी संघाचा मुख्य यष्टिरक्षक फलंदाज आहे.