इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. हैदराबादने २० षटकात २७७ धावा ठोकल्या.
मात्र, याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या फलंदाजांनीही दमदार सुरुवात केली, पण शेवटी ते ३१ धावांनी मागे पडले. या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या खूपच निराश दिसत होता.
पण सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून असे दिसून येत आहे, की मुंबई इंडियन्सच्या संघात सर्वकाही अलबेल नाही.
वास्तविक, या व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करताना दिसत आहे. यादरम्यान हार्दिक पंड्याही त्याच्या संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत हस्तांदोलन करतो, शेवटी मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा त्याच्या समोर येतो. हार्दिक मलिंगाशी हस्तांदोलन करतो पण त्यानंतर तो त्याला दूर ढकलताना दिसतो आहे.
यावेळी लसिथ मलिंगाचा चेहरा पडलेला दिसत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यावरून हार्दिक आणि मुंबईच्या संघातील काही सदस्यांमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे स्पष्ट होते .
श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. मुंबई इंडियन्स ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनला यात मलिंगाची खूप मोठी भूमिका राहिली आहे. आता आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर मलिंगा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम करत आहे. मधल्या काळात तो राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील झाला होता, पण २०२३ मध्ये तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे.
सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी स्फोटक फलंदाजी केली आणि २० षटकांत २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत केवळ २४६ धावाच करू शकला. अशाप्रकारे हार्दिक पंड्या कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
संबंधित बातम्या