भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी एमएस धोनी आणि कपिल देव यांच्यावर टीका केली आहे. योगराज सिंग हे या दोन्ही दिग्गजांवर चांगलेच संतापलेले दिसले.
योगराज सिंग म्हणाले की, मी एमएस धोनीला कधीही माफ करणार नाही. याशिवाय योगराज सिंह यांनी भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्याबद्दलही नकारात्मक गोष्टी सांगितल्या.
विशेष म्हणजे, योगराज सिंग यांनी एमएस धोनीबाबत वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकदा धोनीवर असभ्य भाषेत टीका करताना दिसले आहेत.
योगराज सिंग यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, यात ते बोलताना म्हणाले की, “मी एमएस धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याने आरशात आपला चेहरा पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे, मी त्याचा आदर करतो, पण त्याने माझ्या मुलासोबत जे केले. ते सर्वांसमोर आहे. मी माझ्या आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत, ज्यांनी माझ्याशी वाईट केले त्यांना मी कधीच माफ केले नाही, जरी ते माझ्या घरचे माझे बायको मुलं असतील.”
योगराज सिंग पुढे म्हणाले, की "त्या माणसाने (एमएस धोनी) माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले, युवराज आणखी ५ वर्षे खेळू शकला असता. मी तुम्हाला युवराज सिंगसारखा मुलगा घडवण्याचे आव्हान देतो.
अगदी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागनेही म्हटले आहे की, युवराजसारखा दुसरा कोणीच नाही. कॅन्सरसारखा आजार असतानाही त्याने देशाला विश्वचषक जिंकून दिला. यासाठी त्याला भारतरत्न हा सन्मान मिळायला हवा".
याशिवाय कपिल देवबद्दल बोलताना योगराज सिंग म्हणाले की, “मी महान कर्णधार कपिल देव यांना एकदा म्हणालो होतो की, "मी तुला अशा स्थितीत नेऊन सोडेन की जग सगळं जग तुझ्यावर थुंकेल. आज युवराज सिंगकडे १३ ट्रॉफी आहेत आणि त्याच्याकडे फक्त एक. बस विषय संपला."