IPL 2024: चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी महेंद्रसिंग धोनीनंतर पुढील कर्णधारासाठी फ्रँचायझीमध्ये उत्तराधिकार योजना काय असेल, यावर भाष्य केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने संयुक्तपणे सर्वाधिक पाच आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. मात्र, यंदाची आयपीएल धोनीच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, अशी अटकळ बांधली जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या हंगामातील सलामीच्या सामन्यापूर्वी तो सराव करताना दिसला होता.
धोनी गेल्या हंगामात गुडघ्याची दुखापत असतानाही खेळला होता. दरम्यान, सीएसकेला जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एका हंगामासाठी आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन निश्चित केले. दरम्यान, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन यांनी सांगितले की, एन श्रीनिवासन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "एमएस धोनी आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग पुढील कर्णधार आणि उपकर्णधार निवडतील."
सीएसकेने आयपीएल २०२२ मध्ये रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती केली होती. परंतु, जाडेजाच्या नेतृत्वात सीएसकेच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा धोनीची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.
"आम्ही नेहमीच बाद फेरीसाठी पात्र ठरण्यावर भर दिला आहे. हेच आमचे पहिले उद्दिष्ट आहे. त्यानंतर ते त्या दिवशीच्या कामगिरीवर अवलंबून असते. आम्ही आताही त्याचे पालन करत आहोत. प्रत्येक मोसमापूर्वी एमएस धोनी आम्हाला सांगतो की, 'आधी आपण साखळी सामन्यांवर लक्ष केंद्रित करूया. आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करू'. होय, दडपण आहे. पण गेल्या काही वर्षांत आमच्या सातत्यामुळे बहुतांश खेळाडूंना या दडपणाची सवय झाली आहे", असे काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.