Delhi Vs Railways Ranji Trophy Match : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने संघातली सर्वच खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे, बंधनकारक केले आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा याच्यानंतर आता टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली यानेही १२ वर्षानंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळला.
पण १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीत पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने चाहत्यांची निराशा केली. दिल्ली आणि रेल्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात विराटला पहिल्या डावात केवळ ६ धावा करता आल्या.
त्याच्या फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते, अशा स्थितीत विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण रेल्वेच्या २९ वर्षीय गोलंदाज हिमांशू सांगवान याने विराट कोहलीची शिकार केली. त्याने या क्रिकेट दिग्गजाला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीला बोल्ड केल्यानंतर हिमांशू सांगवान कोण आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे.
हिमांशू सांगवान देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळतो. २९ वर्षीय सांगवान याचा जन्म २ सप्टेंबर १९९५ रोजी दिल्लीत झाला. टीम इंडियाकडून खेळण्याची वाट पाहत असलेल्या हिमांशूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
त्याने २०१९-२० मध्ये रेल्वेसाठी रणजी पदार्पण केले. त्याच मोसमात विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये त्याचे पदार्पण झाले. वेगवान गोलंदाज हिमांशूने २३ प्रथम श्रेणी सामन्यात एकूण ७७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर १७ लिस्ट ए सामन्यात २१ विकेट आहेत. याशिवाय त्याने देशांतर्गत टी-20 मध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत.
विराट कोहलीची विकेट घेणारा हिमांशू देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी तिकिट कलेक्टर होता.
हिमांशूने मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर आपली छाप पाडली. मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने ६० धावा देत ६ विकेट घेत चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
विराट कोहलीने शेवटचा रणजी सामना २०१२ मध्ये खेळला होता. त्यावेळी त्याने दोन्ही डावांत मिळून ५७ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या