दिल्ली संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. दिल्ली हा पहिला क्रिकेट संघ बनला आहे, ज्यांच्या सर्व ११ खेळाडूंनी टी-20 सामन्यात गोलंदाजी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मणिपूरविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाने ही कामगिरी केली.
या लढतीत मणिपूरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी वेगळ्या रणनीतीने मैदानात उतरला.
कर्णधार आयुष बडोनी हा यष्टिरक्षक आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानेही या सामन्यात दोन षटके गोलंदाजी केली. आणखी एक मनोरंजक विषय असा होता की, प्रोफेशनल गोलंदाज नसतानाही बडोनीने एक ओव्हर मेडन टाकली. दिल्लीकडून हर्ष त्यागी, दिग्वेश राठी आणि मयंक रावत यांनी प्रत्येकी तीन षटके गोलंदाजी केली.
दिल्लीच्या सर्वच्या सर्व ११ खेळाडूंनी गोलंदाजी केली. ज्यांच्या विरोधात मणिपूर संघ निर्धारित २० षटकात केवळ १२० धावाच करू शकला. दिल्लीने हा सामना ९ चेंडू शिल्लक असताना ४ विकेटने जिंकला.
दिल्लीसाठी ११ खेळाडूंनी गोलंदाजी केली, त्यापैकी हर्ष त्यागी आणि दिग्वेश राठी यांनी उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने घातक गोलंदाजी केली आणि प्रत्येकी २ बळी घेतले. कर्णधार आयुष बडोनीसह प्रियांश आर्य आणि आयुष सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये अनेक संघांनी ९ गोलंदाजांचा वापर केला होता. ही घटना भारतीय संघाच्या कसोटी सामन्याची आठवण करून देते जेव्हा टीम इंडिया २००२ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत होती. त्या सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीने स्वतःसह इतर १० खेळाडूंना गोलंदाजी दिली. हा सामना मे २००२ मध्ये खेळला गेला होता, जो अनिर्णित राहिला. मात्र ११ गोलंदाजांमुळे हा सामना खूप चर्चेत राहिला.