दिल्ली कॅपिटल्सचे नवे प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी मेगा लिलावापूर्वी ऋषभ पंत याला संघातून रिलीज करण्याबाबत मोठे विधान केले आहे. पंतला आयपीएल २०२५ साठी रिटेन का करण्यात आले नाही, हे त्यांनी सांगितले आहे. पंत २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्समध्ये होता.
पण आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी त्याला सोडण्यात आले. यानंतर पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना विकत घेतले.
हेमांग बदानी यांनी सांगितले, की पंतला स्वतःला दिल्ली कॅपिटल्समध्ये रिटेन व्हायचे नव्हते. कारण त्याला वाटत होते की त्याची किंमत १८ कोटींपेक्षा जास्त आहे. सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्या यूट्यूब शोमध्ये हेमांग बदानी यांनी हा खुलासा केला.
ते म्हणाले, की लिलावात जाऊन त्याला त्याची खरी किंमत जाणून घ्यायची होती. जर एखाद्या खेळाडूला रिटेन करायचे असेल तर संघ आणि खेळाडू दोघांनीही सहमत असणे आवश्यक आहे. आम्ही त्याच्याशी बोललो, मॅनेजमेंटही त्याच्याशी बोलले. अनेक फोन कॉल्स आणि मेसेजची देवाणघेवाण झाली.
बदानी पुढे म्हणाले, 'होय, दिल्ली कॅपिटल्सला त्याला रिटेन करायचे होते. पण त्याने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला. १८ कोटींहून अधिक रक्कम मिळू शकेल असे त्याला वाटले.
लिलावात त्याला २७ कोटी रुपये मिळाले. त्याच्यासाठी चांगले आहे. तो खूप चांगला खेळाडू आहे. "आम्ही त्याला मिस करू."
दरम्यान, ऋषभ पंतने यात पैशांचा संबंध नव्हता, असे यापूर्वीच ट्वीट करून सांगितले होते. मग आता हेमांग बदानी जे बोलले, त्यावरून पंत खोटं बोलला का असा प्रश्न निर्माण होत आहे.
संबंधित बातम्या