कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२५ पूर्वी ६ खेळाडूंना रिटेन केले. मात्र कर्णधार श्रेयस अय्यरला त्यांनी संघासोबत ठेवले नाही. आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अय्यरबाबत एक मोठे भाकीत केले आहे.
गावस्कर यांनी सांगितले, की श्रेयस अय्यर याला कोणते संघ खरेदी करू शकतात. गावस्करांच्या मते, केकेआरने अय्यरवर बोली लावावी, पण तसे न झाल्यास दिल्ली कॅपिटल्स श्रेयसला खरेदी करू शकतात.
IPL २०२५ चा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. गावस्कर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर बोलताना अय्यरबद्दल म्हणाले, "गेल्या हंगामात केकेआरने जेतेपद पटकावले तेव्हा श्रेयस अय्यर कर्णधार होता. मला वाटते की श्रेयस अय्यर लिलावात आल्यानंतर केकेआर त्याच्यावर बोली लावू शकेल.
केकेआरने तसे न केल्यास दिल्ली कॅपिटल्स त्याच्या मोठी बोली लावू शकतात. दिल्लीला कर्णधाराची गरज आहे. ऋषभ पंत संघात नाही, अशा स्थितीत ते अय्यरला विकत घेण्याचा प्रयत्न करतील.
श्रेयस अय्यरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११५ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ३१२७ धावा केल्या आहेत. अय्यरने आयपीएलमध्ये २१ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ९६ धावा आहे. त्याने या स्पर्धेत २७१ चौकार आणि ११३ षटकार मारले आहेत.
श्रेयसने टीम इंडियासाठी ५१ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११०४ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ८ अर्धशतके केली आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संंघाने आयपीएल २०२५ पूर्वी ६ खेळाडूंना कायम ठेवले आहे. संघाने रिंकू सिंगला १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी १२ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. आंद्रे रसेललाही १२ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर हर्षित राणा आणि रमणदीप सिंग यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.