LSG vs DC Highlights : सलग दोन पराभवानंतर दिल्लीनं चाखली विजयाची चव, फ्रेजर मॅकगर्क -पंतने लखनौला धुतलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs DC Highlights : सलग दोन पराभवानंतर दिल्लीनं चाखली विजयाची चव, फ्रेजर मॅकगर्क -पंतने लखनौला धुतलं

LSG vs DC Highlights : सलग दोन पराभवानंतर दिल्लीनं चाखली विजयाची चव, फ्रेजर मॅकगर्क -पंतने लखनौला धुतलं

Published Apr 12, 2024 11:32 PM IST

LSG vs DC Indian Premier League 2024 : दिल्लीने लखनौचा ६ गडी राखून पराभव करत या मोसमातील दुसरा विजय नोंदवला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

LSG vs DC Indian Premier League 2024
LSG vs DC Indian Premier League 2024 (PTI)

LSG vs DC Indian Premier League 2024  : आयपीएल २०२४ च्या २६व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ६ गडी राखून पराभव केला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आज (१२ एप्रिल) झालेल्या या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १८.१ षटकात लक्ष्य गाठले.

या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही कारण डेव्हिड वॉर्नर केवळ ८ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर पृथ्वी शॉने जबाबदारी स्वीकारली, पण मागील सामन्याप्रमाणे याही सामन्यात त्याचे अर्धशतक हुकले. तो २२ चेंडूत ३२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

दिल्लीने पूर्वार्धात अतिशय संथ फलंदाजी केली, मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि नवोदित जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी तुफानी शैलीत फलंदाजी करत LSG च्या गोलंदाजांची धुलाई केली. एकीकडे पंतने २४ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तर मॅकगर्कने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले.

दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या १० षटकांत २ बाद ७५ धावा होती, पण येथून डीसीच्या फलंदाजांनी वेग पकडण्यास सुरुवात केली. ऋषभ पंत आणि मॅकगर्क यांनी पुढच्या २४ चेंडूत ६१ धावा केल्या आणि ४ षटकांच्या या कालावधीत दोघांनी मिळून ५ गगनचुंबी षटकार आणि ४ चौकार लगावले. 

पण पंधराव्या षटकात मॅकगर्क आणि पुढच्याच षटकात ऋषभ पंत बाद झाल्याने सामना अडकलेला दिसत होता. पंत आणि मॅकगर्क यांच्यात ७७ धावांची भागीदारी झाली होती. त्यामुळे दिल्लीला ३ षटकात फक्त १० धावा हव्या होत्या. शे होप आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी घाई न करता आरामात लक्ष्य गाठले.

लखनौचा डाव

तत्पूर्वी, लखनौने अवघ्या ७४ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर आयुष बडोनीने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या आणि अर्शद खाननेही १६ चेंडूत २० धावा करत लखनौला १६७ धावांपर्यंत नेले. दरम्यान, अर्शद खाननेही गोलंदाजीत आपली लाईन, लेन्थ आणि गतीने प्रभावित केले. 

त्याआधी क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी झाली, मात्र खलील अहमदने आपल्या घातक गोलंदाजीने ती मोडून काढली. डी कॉकच्या रूपाने त्याने संघाला पहिला धक्का दिला. तो १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाला दुसरा धक्का देवदत्त पडिक्कलच्या रूपाने बसला, तोही खलीलच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याला केवळ ३ धावा करता आल्या.

या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी छाप पाडली. खलीलनंतर कुलदीप यादवनेही धुमाकूळ घातला. त्याने पहिल्याच षटकात लागोपाठ २ चेंडूत २ विकेट घेतल्या. डावाच्या आठव्या षटकात त्याने स्टॉइनिस (८) आणि निकोलस पूरन (००) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शेवटी अर्शद खान आणि आयुष बदोनी यांनी लखनौला १६७ धावांपर्यंत पोहोचवले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या