भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत आहे. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सिडनीची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी तेवढी चांगली ठरलेली नाही.
या विकेटवर वेगवान गोलंदाजांना आतापर्यंत खूप फायदा मिळाला आहे. यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात केवळ १८५ धावा करून सर्वबाद झाली. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या.
या फलंदाजीच्या कामगिरीनंतर भारतीय चाहते नक्कीच थोडे निराश झाले. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सतत झुंजताना दिसले.
पण या कठीण काळात, ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज भारतासाठी नक्कीच डोकेदुखी ठरला. ३१ वर्षीय ब्यू वेबस्टर याने या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. ब्यू वेबस्टर हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने या सामन्यात अर्धशतक केले आहे.
या सिडनी कसोटीत मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टरने स्थान मिळवले. मधल्या फळीत ४ विकेट पडल्यानंतर तो त्याच्या जागी फलंदाजीला आला. तो पदार्पण कसोटी खेळत होता.
पण ब्यू वेबस्टर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून अजिबात वाटत नव्हते की ही वेबस्टरची पदार्पणाची कसोटी आहे. पण त्याने सॅम कोन्टाससारखा बालिशपणा दाखवला नाही, तो अनुभवी खेळाडूसारखा खेळत होता. तसेच वेबस्टरला कोणत्याही भारतीय खेळाडूच्या संतापाचा सामना करावा लागला नाही. तो कोणत्याही वादात न पडता शांतपणे आपले काम करून निघून गेला.
वेबस्टरने पहिल्या डावात १०५ चेंडूंचा सामना केला आणि ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. पहिल्या डावात १८१ धावा करून ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला.
संबंधित बातम्या