DC Vs UPW WPL 2024 Scorecard : महिला प्रीमियर लीगमध्ये आज (८ मार्च) युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. या सामन्यात युपीने शेवटच्या षटकात विजय मिळवला.
दिल्ली सहज सामना जिंकेल वाटत होते, पण शेवटच्या षटकात ग्रेस हॅरिसने कमाल करत युपीला सामना जिंकून दिला.
तत्पूर्वी, युपीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ १९.५ षटकात १३७ धावांवर ऑल आऊट झाला.
दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने ४६ चेंडूत ६० धावा केल्या. दिल्लीची अवस्था एकवेळ १६ षटकात ४ बाद ११२ धावा अशी होती आणि दिल्लीचा संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण यानंतर १७व्या षटकात जेमिमाह रॉड्रिग्स बाद झाली आणि संघाला गळती लागली. दिल्लीचे ६ फलंदाज शेवटच्या तीन षटकात बाद झाले.
शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १० धावांची गरज होती. फलंदाजीला राधा यादव आणि जेस जोनासन होते. तर चेंडू फिरकीपटू ग्रेस हॅरिसच्या हातात होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर राधा यादवने दमदार षटकार ठोकला. यामुळे आता दिल्लीला ५ चेंडूत ४ धावा हव्या होत्या. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राधाने पुन्हा दमदार फटका मारला आणि दोन धावा घेतल्या. आता संघाला ४ चेंडूत दोन धावा हव्या होत्या.
पण या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ग्रेस हॅरिसने राधाला झेलबाद केले. यानंतर चौथ्या चेंडूवर तानिया भाटिया फलंदाजीला आली. पण एक धाव घेण्याच्या नादात जेस जोनासन धावबाद झाली. आता पाचव्या चेंडूवर तितस साधू फलंदाजीला आली. दिल्लीसाठी ती शेवटची फलंदाज होती. तीतसने येताच हवेत फटका मारला. पण चेंडू थेट मिड ऑनवर उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात गेला आणि दिल्लीचा संघ ऑलआऊट झाला. तर युपीने सामना जिंकला.
यूपीकडून दीप्ती शर्माने ४ तर सायमा आणि हॅरिसने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. सोफी एक्लेस्टोनला एक विकेट मिळाला.
तत्पूर्वी, ॲलिसा हेलीच्या नेतृत्वाखालील युपीची सुरुवात अतिशय वाईट झाली. यूपीची स्फोटक फलंदाज किरण नवगिरे दुसऱ्याच षटकात बाद झाली. तिला तीतस साधूने क्लीन बोल्ड केले. किरणने केवळ ५ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार हिली २९ धावा करून बाद झाली. यानंतर लगेच ताहिला मॅकग्राच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. तिला अरुंधती रेड्डीने बाद केले.
यानंतर ग्रेस हॅरिसने १४, श्वेता सेहरावत ४, पूनम खेमनार १, सोफी एक्लेस्टोनने ८ धावा हे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. तर शेवटी सायमा ठाकूर आणि गौहर सुलताना अनुक्रमे ५ आणि १ धावा करून नाबाद राहिल्या.
दिल्लीकडून तीतस साधू आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. तर शिखा, अरुंधती, जेस जोनासन आणि ॲलिस कॅप्सीने प्रत्येकी एक विकेट घेतली.