DC vs RCB Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा १७ वा सामना आज (१० मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने आरसीबीसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने २० षटकांत १८० धावांपर्यंत मजल मारली. त्यांचा केवळ एका धावेने पराभव झाला.
शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. तर फलंदाजीला रिचा घोष आणि दिशा कसट होत्या. चेंडू फिरकी गोलंदाज जेस जोनासनच्या हातात होता.
या षटकातील पहिल्याच चेंडूवर रिचा घोषने स्ट्रेट षटकार ठोकला. आता संघाला विजयासाठी ५ चेंडूत ११ धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवर रिचाने मोठा फटका मारला पण दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात दिशा कसट धावबाद झाली.
रिचा घोष स्ट्राइकवरच होती तर नवीन फलंदाज म्हणून श्रेयांका पाटील क्रीजवर आली. चौथ्या चेंडूवर रिचाने आणखी दोन धावा घेतल्या.
आता आरसीबीला शेवटच्या दोन चेंडूत ८ धावांची गरज होती. अशात रिचा घोषने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर RCB ला एका चेंडूवर २ धावा हव्या होत्या पण पहिलीच धाव घेण्याच्या प्रयत्नात रिचा धावबाद झाली. अशा प्रकारे दिल्लीने एका धावेने सामना जिंकला.
आरसीबीकडून रिचा घोषने २९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५१ तर एलिस पेरीने ४९ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी झाली. शेफाली २३ धावा करून बाद झाली. आशा शोभनाने तिला बाद केले. यानंतर आठव्या षटकात श्रेयंका पाटीलने संघाला दुसरा धक्का दिला. तिने मेग लॅनिंगला एलबीडब्ल्यू आऊट केले. लॅनिंगने ५ चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या.
दिल्लीकडू जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तिने एलिस कॅप्सीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयंका पाटीलने जेमिमाहला बाद केले. त्याच वेळी, एलिस कॅप्सीही ३२ चेंडूत ४८ धावा करून बाद झाली, तिलाही श्रेयंकाने बाद केले. शेवटी मारिजेन कॅफ आणि राधा यादवने संघाला १८० चा टप्पा गाठून दिला.
तर आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक चार बळी घेतले. त्याचवेळी आशा शोभना यांना यश मिळाले.
संबंधित बातम्या