DC vs GG Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीग २०२४चा शेवटचा साखळी सामना आज (१३ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातची कर्णधार बेथ मूनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात १२६ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात दिल्लीने अवघ्या १३.१ षटकात ३ बाद १२९ धावा करत सामना जिंकला. यासह दिल्ली कॅपिटल्सने WPLच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या मोसमातही मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यावेळी त्यांचा मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव झाला होता.
गुजरातच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून शेफाली वर्माने अवघ्या ३७ चेंडूत ७१ धावांचा पाऊस पाडला. तिने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. तर जेमिमाह रॉड्रिग्सने २८ चेंडूत ३८ धावा केल्या. तिने ४ चौकार आणि १ षटकार खेचला. मेग लॅनिंग १० चेंडूत ४ चौकारांसह १८ धावा करून धावबाद झाली.
तत्पूर्वी, या सामन्यात गुजरातची सुरुवात खराब झाली. लॉरा वॉल्वार्ड आणि बेथ मुनी लवकर बाद झाल्या. वॉल्वार्डने ७ तर मुनी शुन्यावर बाद झाले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दयालन हेमलताला केवळ ४ धावा करता आल्या.
गुजरातकडून भारती फुलमाळी हिच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला क्रीजवर जास्त काळ टिकता आले नाही. भारतीने ३६ चेंडूत ४२ धावा केल्या. तिने ७ चौकार मारले. यानंतर शेवटी कॅथरीन ब्राईस २८, फोबी लिचफिल्ड २१ आणि एशले गार्डनरने १२ धावा करत संघाला १२६ धावांपर्यंत पोहोचवले.
दिल्लीकडून मॅरिझान कॅप, शिखा पांडे आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जेस जोनासनला एक विकेट मिळाली.
संबंधित बातम्या