डेव्हिड वॉर्नर क्रिकेट वर्ल्डकप २०२३ नंतर निवृत्त होणार, असे बोलले जात होते. पण वॉर्नरनेच आपल्या निवृत्तीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. डेव्हिड वॉर्नरने पुढचा वर्ल्डकप म्हणजेच, २०२७ पर्यंत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
क्रिेकेट वर्ल्डकपम २०२३ मध्ये वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या दरम्यान, ट्विटरवरील एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना, वॉर्नरने स्पष्ट केले की तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे आणि तो पुढचा विश्वचषकही खेळू शकतो.
वॉर्नर सध्या ३७ वर्षांचा आहे. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खेळली जाणारी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका आहे. हे वॉर्नरने या वर्ल्डकपच्या सुरुवातीलाच सांगितले होते.
डेव्हिड वॉर्नर कसोटीतून निवृत्ती घेईल, पण तो वनडे क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. एकाने X वर वॉर्नरची एकदिवसीय कारकीर्द उत्कृष्ट रितीने संपली, असे लिहिले होते. या पोस्टला प्रत्युत्तर देताना वॉर्नरने लिहिले की, "कोण म्हणाले मी संपलो?" म्हणजेच, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे, असे स्पष्ट संकेत त्याने दिले आहेत.
वॉर्नरने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांच्या ११ डावांमध्ये ४८.६४ च्या सरासरीने आणि १०८.३० च्या स्ट्राईक रेटने ५३५ धावा केल्या. यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या १६३ धावा होती, जी पाकिस्तानविरुद्ध बनवली.
वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने आतापर्यंत १०९ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ९९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या १९९ डावांमध्ये ८४८७ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांच्या १५९ डावांमध्ये ६९३२ धावा केल्या आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ९९ डावांमध्ये वॉर्नरने २८९४ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत २५ शतके, एकदिवसीय सामन्यात २२ आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १ शतक झळकावले आहे.
संबंधित बातम्या
