
david warner makes most centuries as opener : क्रिकेट विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आमने सामने आहेत. दोन्ही संघांमधीला हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद ३६७ धावा केल्या आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूत १४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १६३ धावा केल्या. आपल्या शतकी खेळीच्या जोरावर वॉर्नरने पुन्हा एकदा दाखवून दिले की तो शतकांच्या बाबतीत सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मापेक्षा कितीतरी पुढे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून वॉर्नरचे हे ४७ वे शतक होते.
भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत, पण एक सलामीवीर म्हणून सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके झळकावली आहेत. तर वॉर्नरचा आकडा ४७ पर्यंत पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. गेलने सलामीला खेळताना एकूण ४२ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.
या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या ४१ शतकांसह चौथ्या स्थानावर आहे, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन ४० शतकांसह पाचव्या आणि रोहित शर्मा ४० शतकांसह सहाव्या स्थानावर आहे.
४७ शतके - डेव्हिड वॉर्नर
४५ शतके - सचिन तेंडुलकर
४२ शतके - ख्रिस गेल
४१ शतक - सनथ जयसूर्या
४० शतके - मॅथ्यू हेडन
४० शतके - रोहित शर्मा.
दरम्यान, या सामन्यात वॉर्नरसोबत सलामीला येणाऱ्या मिचेल मार्शनेही शानदार शतक झळकावले. मार्शने १०८ चेंडूत १० चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या. वॉर्नर आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी २०३ चेंडूत २५९ धावांची भागीदारी केली. दोघांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून ३६७ धावा केल्या. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ३६८ धावा कराव्या लागणार आहेत.
संबंधित बातम्या
