David Warner Last Test Match : ऑस्ट्रेलिया सलामीवीर आणि दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आपला शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे खेळला. त्याने आपल्या करिअरच्या शेवटच्या सामन्यात शानदार कामगिरी केली आणि क्रिकेट जगताचा निरोप घेतला. वॉर्नरने आपल्या शेवटच्या कसोटी डावात शानदार अर्धशतक झळकावले.
सिडनी कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने २ गड्यांच्या मोबदल्यात गाठले आणि पाकिस्तानचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला, यासह ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला.
१३० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने ५७ धावांची झटपट खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार मारले. डेव्हिड वॉर्नरने आपली अखेरची खेळी यादगार बनवली. त्याने करिअरच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३४ धावा केल्या तर दुसऱ्या डावात ५७ धावा केल्या. अशा प्रकारे त्याने आपल्या शेवटच्या कसोटीत ९१ धावा करत आपल्या सुवर्ण कारकिर्दीचा शेवट केला.
डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळता थेट कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वॉर्नरने २०११ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून, तो ऑस्ट्रेलियासाठी ११२ सामने खेळला. यामध्ये त्याने ४४.६ च्या सरासरीने ८७७६ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीत वॉर्नरने २६ शतके आणि ३७ अर्धशतके केली, तर तीन वेळा त्याने २०० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली.
डेव्हिड वॉर्नरचे आकडे केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नाही तर एकदिवसीय आणि टी-20 मध्येही जबरदस्त आहेत. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाकडून १६१ एकदिवसीय आणि ९९ टी-20 सामने खेळले आहेत. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६९३२ धावा केल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर २८९४ धावा आहेत.
यासोबतच पाकिस्तान संघाची लज्जास्पद कामगिरी ऑस्ट्रेलियात कायम राहिली. १९९५ पासून पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. १९९५ मध्ये सिडनी येथे वसीम अक्रमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने शेवटची कसोटी जिंकली होती. १९९५ नंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेत पाकिस्तानचा व्हाईटवॉश होण्याची ही सहावी वेळ आहे.
संबंधित बातम्या